Friday, 9 January 2015

१२ वाजले...

                नाही..नाही..लगेच घड्याळाकडे नजर वळवू नका..घड्याळात नाही तर मी काही दिवसांपूर्वी जोराशोरात केलेल्या ऐलान-ए-डाएट प्लॅनचे १२ वाजलेत. अर्थात, हे जाहीरपणे सांगताना आनंद निश्चितच होत नाहीए कारण कधीतरी आपण यशस्वीरित्या वजन कमी करू अशी वेडी आशा मनात कायम आहे. पण या निमित्ताने या गोष्टीचा नकळत मनाने आढावा घेतला की अशा कित्येक गोष्टी आपण अगदी नियमित करायच्या ठरवतो पण वास्तवात मात्र त्या एकदा किंवा फार तर दोनदा च्या पुढे जात नाहीत. खरंतर १२ वाजणे याचा एखादा सरळसोट अर्थ असेल असे वाटत नाही. म्हणजे एखादी ठरवलेली गोष्ट त्याप्रमाणे झाली नाही, एखाद्या गोष्टीसाठी मोठ्यांचा सज्जड दम मिळणार असेल किंवा एखादी गोष्ट अजिबात मनाप्रमाणे झाली नसेल तर साधारणत: असा वाक्यप्रयोग आपण बोली भाषेत करतो. म्हणजे, साधारणत: ‘आज तर माझे १२ च वाजणार आहेत’ असा!
                  या १२ वाजण्याबाबत म्हणायचं तर ते प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या संदर्भात आणि (वाचायला थोडं विचित्र वाटेल पण) वेगवेगळ्या वेळी वाजत असतात. कधी नेहमीची ट्रेन चुकून दिवसाच्या वेळापत्रकाचे १२ वाजतात तर कधी मित्राच्या आग्रहास्तव जेवणानंतर समोसा खाल्ल्याने पोटाचे १२ वाजतात. कधी काही अतिउत्साही पाहुण्यांमुळे एखाद्या पार्टीचे १२ वाजतात तर कधी एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण करियरचेच १२ वाजतात. कधी परिक्षेचा निकाल पाहून एखाद्याच्या चेह-यावर १२ वाजतात तर कधी मुलांचे हट्ट पुरवताना एखाद्याच्या महिन्याच्या बजेटचे १२ वाजतात. कुणाचे प्रेमात १२ वाजतात तर कुणाचे उद्योग-धंद्यात. असे प्रत्येकाचे रोज १२ वाजतच असतात. ‘मला जाऊ दया ना घरी आता वाजले की बारा…’ या गाण्याचा परस्पर या सा-याशी काही संबंध नसला तरी आता मी लवकर घरी गेले नाही तर घरी माझे बारा वाजतील असे तर नायिकेला सुचवायचे नसेल असा प्रश्न मला पडल्यावाचून रहात नाही.

                      मुळात अशा परिस्थितींना १२ वाजले असं का म्हणतात हे मला आजवर न उलगडलेलं कोडं आहे. आपल्यापैकी कुणाला हे ठाऊक असल्यास कृपया माझ्या ज्ञानात भर घालावी. पण एक नक्की की आपलं आयुष्य अशाच छोट्या-मोठ्या १२ वाजण्यांनी भरलेलं आहे आणि हे १२ वाजतात तेव्हाच तर घड्याळाप्रमाणे पुन्हा १ पासून मोजायला सुरूवात होऊन आपले मार्गक्रमण पुन्हा पहिल्यापासून सुरू होते. म्हणूनच जर तुमचे माझ्याचप्रमाणे कुठल्याही बाबतीत १२ वाजले असतील तर निराश न होता ही १ पासून सुरू करायची आणखी एक संधी आहे असा विचार करायला हरकत नाही.

Monday, 29 December 2014

हलकं-फुलकं


अखेर ज्याची भीती होती तेच झालं. जिममध्ये जाण्याची टाळाटाळ, जिभेचे चालवलेले अवास्तव लाड आणि काहीशा अनुवांशिकतेमुळे सध्या वजनाचा काटा माझाच काटा काढू पाहतोय. पण मी देखील आता बाह्या सरसावून त्याच्याशी दोन हात करण्याचा चंग बांधलाय. खरंतर, वेट लॉस मनावर घ्यायचं हे अनेकदा मनात येऊन गेलं पण प्रत्येकवेळी ते मनातल्या मनातच राहिलं. कितीतरी मोफत सल्ले आले. मध्यंतरी मी आधी कसा जाड होतो आणि आता मात्र सलमानला टफ देऊ शकतो असे सांगणारेही महाभाग सापडले. तर काही वजन कमी करणे वगैरे हा सारा भंपकपणा आहे, एकदा वाढलेलं वजन पुन्हा कधीही कमी होऊ शकत नाही असा छातीठोकपणे दावा करणारेही भेटले. हे जीव मला सर्व प्रयत्न करून दमलेले फ़्रसट्रेटेड सोल्स वाटले आणि सुदैवाने मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं.

सोनाराने कान टोचल्याशिवाय अक्कल येत नाही म्हणतात. त्यानुसार जेव्हा डॉक्टरने या बाबतीत मला सूचना केल्या आणि यामुळे होणा-या त्रासाची मला कल्पना दिली तेव्हा मी जणू झोपेतून खडबडून जागी झाले आहे. सध्या काही कारणांस्तव नोकरी-धंद्यात ब्रेक मिळाला असल्याने वजन कमी करणे हा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. बघू, कितपत शक्य होतंय.

तसे हे प्रयत्न यापूर्वीही अनेकदा करून झालेत म्हणा! पण दिल है कि मानता नही. प्रत्येकवेळी किमान यावेळी माझ्या प्रयत्नांना यश लाभेल आणि मी अगदी चवळीची शेंग नाही झाले तरी डबल एक्स एल वरून एक्स एक आणि मग एल वर येऊ शकेन अशी वेडी आशा मनात असतेच. खरंच, वजन वाढल्याने सगळ्यात मोठा प्रश्न कपड्यांचाच निर्माण होतो. म्हणजे काही विशिष्ट पद्धतींच्या कपड्यांवरच समाधान मानावं लागतं, ते विशिष्ट ठिकाणाहूनच खरेदी करावे लागतात. त्यातही एखादा दुकानदार आपल्याला आवडलेल्या टॉप किंवा कुर्तीला आपकी साइज में नही है भाभी असं म्हणाला की  कानाखाली चपराक बसल्यासारखं होतं, नाही का? हे झालं नुसतं कपड्यांचं पण वजन कमी करण्यामागे कुणाचीही अगदी काहीही कारणं असू शकतात आणि ती कितीही विचित्र असू शकतात.


असो, सध्या माझी वेट लॉस मोहीम जोरात सुरु झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. यादरम्यान मला अनेक गोष्टींचा साक्षात्कार होतोय. आपण आपल्या सध्याच्या जीवनशैलीला, खाण्या-पिण्याच्या सवयींना दोष देत असतो पण त्या बदलणं किंवा त्यावर योग्य तोडगा शोधणं तेवढं अवघड नाही हे मला चांगलंच कळून चुकलंय. खरंतर आपण डाएट करत आहोत असं उघडपणे सांगितलं की अनेकदा तो इतरांच्या चेष्टेचा विषय ठरतो. मग ऑफिसमध्ये, घरात आपण काहीही खाताना दिसलं की टोमणा आलाच म्हणून समजा. पण हे लक्षात घ्यायला हवं की डाएट करणं म्हणजे उपाशी राहणं नव्हे तर आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये सुधारणा करणं. उदाहरणार्थ, दिवसातून दोन ते तीन वेळा पोट भरून जेवण्यापेक्षा पाच ते सहा वेळा थोडा थोडा आहार घेणं योग्य आहे. मधल्या वेळेत भूक चाळवल्यावर चिप्स, बिस्किट्स असं सगळं चरण्यापेक्षा एखादं गाजर किंवा काकडी-बीट कापून खाणं सहज शक्य आहे. फळांचा बाजारात मिळणारा रस पिण्यापेक्षा ताजी फळं खाणं अधिक योग्य आहे आणि सकाळच्या नाश्त्यात महागडया डब्ब्यांमध्ये मिळणा-या कोर्नफ्लेक्स आणि चोकोफ्लेक्सपेक्षा उपमा, पोहे, दडपे पोहे असे पदार्थ खाणं जास्त पौष्टिक आहे. अशा अनेकानेक सुधारणा आपल्या आहारात केल्याने आणि सोबतीला थोडया व्यायामाची जोड दिली की वजन कमी करण्यासाठी कोणत्याही महागडया डाएट प्लानची आवश्यकता नाही. या सगळ्यामुळे ताजंतवानं तर वाटतंच शिवाय खिश्यावर अतिरिक्त ताण न पडल्याने हलकं-फुलकंही वाटतं.


माझ्या मोहिमेसाठी आपल्या शुभेच्छा असू देत!