Friday, 9 January 2015

१२ वाजले...

                नाही..नाही..लगेच घड्याळाकडे नजर वळवू नका..घड्याळात नाही तर मी काही दिवसांपूर्वी जोराशोरात केलेल्या ऐलान-ए-डाएट प्लॅनचे १२ वाजलेत. अर्थात, हे जाहीरपणे सांगताना आनंद निश्चितच होत नाहीए कारण कधीतरी आपण यशस्वीरित्या वजन कमी करू अशी वेडी आशा मनात कायम आहे. पण या निमित्ताने या गोष्टीचा नकळत मनाने आढावा घेतला की अशा कित्येक गोष्टी आपण अगदी नियमित करायच्या ठरवतो पण वास्तवात मात्र त्या एकदा किंवा फार तर दोनदा च्या पुढे जात नाहीत. खरंतर १२ वाजणे याचा एखादा सरळसोट अर्थ असेल असे वाटत नाही. म्हणजे एखादी ठरवलेली गोष्ट त्याप्रमाणे झाली नाही, एखाद्या गोष्टीसाठी मोठ्यांचा सज्जड दम मिळणार असेल किंवा एखादी गोष्ट अजिबात मनाप्रमाणे झाली नसेल तर साधारणत: असा वाक्यप्रयोग आपण बोली भाषेत करतो. म्हणजे, साधारणत: ‘आज तर माझे १२ च वाजणार आहेत’ असा!
                  या १२ वाजण्याबाबत म्हणायचं तर ते प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या संदर्भात आणि (वाचायला थोडं विचित्र वाटेल पण) वेगवेगळ्या वेळी वाजत असतात. कधी नेहमीची ट्रेन चुकून दिवसाच्या वेळापत्रकाचे १२ वाजतात तर कधी मित्राच्या आग्रहास्तव जेवणानंतर समोसा खाल्ल्याने पोटाचे १२ वाजतात. कधी काही अतिउत्साही पाहुण्यांमुळे एखाद्या पार्टीचे १२ वाजतात तर कधी एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण करियरचेच १२ वाजतात. कधी परिक्षेचा निकाल पाहून एखाद्याच्या चेह-यावर १२ वाजतात तर कधी मुलांचे हट्ट पुरवताना एखाद्याच्या महिन्याच्या बजेटचे १२ वाजतात. कुणाचे प्रेमात १२ वाजतात तर कुणाचे उद्योग-धंद्यात. असे प्रत्येकाचे रोज १२ वाजतच असतात. ‘मला जाऊ दया ना घरी आता वाजले की बारा…’ या गाण्याचा परस्पर या सा-याशी काही संबंध नसला तरी आता मी लवकर घरी गेले नाही तर घरी माझे बारा वाजतील असे तर नायिकेला सुचवायचे नसेल असा प्रश्न मला पडल्यावाचून रहात नाही.

                      मुळात अशा परिस्थितींना १२ वाजले असं का म्हणतात हे मला आजवर न उलगडलेलं कोडं आहे. आपल्यापैकी कुणाला हे ठाऊक असल्यास कृपया माझ्या ज्ञानात भर घालावी. पण एक नक्की की आपलं आयुष्य अशाच छोट्या-मोठ्या १२ वाजण्यांनी भरलेलं आहे आणि हे १२ वाजतात तेव्हाच तर घड्याळाप्रमाणे पुन्हा १ पासून मोजायला सुरूवात होऊन आपले मार्गक्रमण पुन्हा पहिल्यापासून सुरू होते. म्हणूनच जर तुमचे माझ्याचप्रमाणे कुठल्याही बाबतीत १२ वाजले असतील तर निराश न होता ही १ पासून सुरू करायची आणखी एक संधी आहे असा विचार करायला हरकत नाही.